- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
जनावरें व माणसें यांचे जीवन पाहिलें तर तें नैसर्गिक नियमांनुसार असतें असें दिसून येते. एक प्रकारच्या उपजत बुद्धीमुळे काय खावें, किती खावें इत्यादि गोष्टी त्यांना कळतात. व्यायाम, विश्रांति, शुद्ध हवा, ऊन इत्यादि गोष्टीही त्यांना स्वयंप्रेरणेनेंच समजतात. 'मनुष्य जसजसा सुधारला गेला व कृत्रिम वातावरणांत राहूं लागला तसतसा तो निसर्गापासून दूर जाऊं लागला आणि मगच त्याच्यावर रोगाची छाया पडूं लागली. मनुष्य शरीरामध्ये येणारे हे रोग आपण कसे रोखू शकतो हे आपण जाणून घेऊयात निसर्गोपचार म्हणजे काय या लेखामध्ये.
निसर्गोपचार म्हणजे काय?
मनुष्याचें जीवन जोपर्यंत नैसर्गिक होतें तोपर्यंत तो पूर्णपणे निरोगी होता. रोग म्हणजे काय याची त्याला गंधवार्ताही नव्हती. परंतु निसर्गाचा संबंध तोडून तो जसजसा कृत्रिम सुधारणेच्या पाशांत गुरफटू लागला,नवीं नवीं, अननुभूत सुखें व चैनीचे पदार्थ त्यांच्या मार्गे लागून तो मोहग्रस्त होऊ लागला तसतसा तो अधिकाधिक खोलात जाऊं लागला. त्याची पूर्वीची आरोग्यकारक रहाणी साफ नाहींशी आली व तिची जागा कृत्रिम, अनारोग्यकारक व सुधारलेल्या जविनक्रमाने घेतली व त्याच्यावर हळूहळू निरनिराळ्या रोगांचा अंमल बसूं लागला.
पूर्वीच्या जंगली मानवप्राण्याला निरोगी राहण्यासाठीं कांहीं सायास करावे लागत नव्हते, तो स्वतः सिद्धच आरोग्यसंपन्न होता; पण सुधारलेल्या मानवप्राण्याला रोगमुक्त होऊन निरोगी रहाण्यासाठी सबंध जन्मभर धडपड करावी लागत आहे. तो जन्माला येतो तोच मुळीं रोगट अवस्थेत येतो. त्याचा वंश, त्याचे पूर्वज व त्याच्या सभोवतालची परिस्थिति यांच्यात इतकी रोगबीजें प्रसृत झालेली असतात कीं नवीन जन्माला येणारे बालक पूर्वजांचे कांहीं अवशेष अगर स्मृतिचिन्ह बरोबर घेतल्याशिवाय या जगांत पाऊल टाकीत नाहीं. अशा प्रकारें जन्मापासूनच आजच्या सुधारलेल्या मानव-प्राण्याची आरोग्यापासून फारकत झालेली आहे. मनुष्याला जर या अवस्थेतून मुक्त व्हावयाचें असेल तर त्यानें हळूहळू नैसर्गिक जीवनाकडे वळलें पाहिजे ,म्हणजे त्यानें लागलींच घरादाराचा त्याग करून जंगलांतच जावयास पाहिजे असें नाहीं. शहरी वातावरणात व सुधारणेच्या केंद्रांत राहून देखील त्याला निसर्गाशी तादात्म्य पावतां येईल. नैसर्गिक आहार, विहार व रहाणी यांचा त्याला पूर्णाशाने स्वीकार करता आला नाहीं तरी निम्या अधिक अंशानें तो निसर्गनियमांचें परिपालन करील तर त्याचें जीवन निरोगी झाल्याशिवाय रहाणार नाहीं.
मनुष्यप्राणी जर पूर्णपणे नैसर्गिक नियमांना अनुसरून वागेल तर त्याला काहीच आजारी पडण्याचें कारण उरणार नाहीं, आणि जगांतले बहुतेक रोग नामशेष होऊन जातील. आधुनिक सुधारणांमुळे मनुष्याचें जीवन इतकें कृत्रिम व अनैसर्गिक झाले आहे कीं, तो कायमचा रोगी न बनेल तरच आश्चर्य !
मांसाशन, दारूसारखी मादक द्रव्यें, मसाल्याचे पदार्थ, तंबाखू,चहा, कॉफी, बैठ्या स्वरूपाचें काम, शहरांतील कोंदट वस्ती.व्यायामाचा अभाव, दिखाऊ व चैनी आयुष्यक्रम, सिनेमा इत्यादि शेकडों गोष्टींमुळे मनुष्यमात्राचे आरोग्य पार रसातळाला जात चाललें आहे. नैसर्गिक रीतीनें रहाणाऱ्या लोकांत हृदयविकार, अपचन, क्षय, अर्धांगवायु, अपस्मार, वेडेपण, कॅन्सर, अपेंडिसायटिस, मेनिन्- जायटिस या प्रकारचे सुधारलेल्या मानवसमाजात आढळणारे विकार सहसा सांपडत नाहींत, हें निरनिराळ्या रानटी लोकांच्या जीवनक्रमाचे संशोधन करणाऱ्यांनी दाखवून दिले आहे. या अनागर व रानटी लोकांप्रमाणें सुधारलेल्या माणसांनीं जर स्वाभाविक आयुष्यक्रमाचा अंगीकार केला तर त्यांच्यावर आजारी पडण्याचा प्रसंग येणार नाहीं.
आजारी पडणें ही विकृति आहे, तर आरोग्य ही मानवी शरीराची स्वाभाविक स्थिति आहे. आपण जर मानवेतर प्राणिसृष्टीकडे पाहिलें तर आपल्याला असा अनुभव येईल कीं, नैसर्गिक रीतीने रहाणारे प्राणी आरोग्याचे आदर्श होत. डॉक्टरी औषधाने अगर शस्त्रक्रियेनें जसा ताबडतोब गुण दिसूं लागतो तसा निसर्गोपचारांचा ताबडतोब गुण कां येत नाहीं ? असा निसर्गोपचारासंबंधी नेहेमी आक्षेप घेण्यांत येतो. हा आक्षेप मुळांतच चुकीचा आहे. औषधाच्या बाटलीमुळे जरी क्षणिक बरें वाटलें तरी त्या औषधानें रोगाचें समूळ उच्चाटण होत नाहीं. कांहीं काळ रोग तसाच दाबला जातो. त्यामुळे आज जरी औषधांचा परिणाम दिसून आला तरी उद्यां तो रोग पुन्हां उलटणार नाहीं कशावरून ?
निसर्गोपचारांच्या बाबतींत रोग उलटण्याची भीति नाहीं. कारण नैसर्गिक उपचार हे वरवरचे नसतात, तर थेट मूलगामी स्वरूपाचे असतात. मात्र सर्वसामान्य जनतेला निसर्गोपचार कां रुचत नाहीं याचे कारण असें आहे कीं, डॉक्टराचे औषध घेणें फार सोपें असतें. स्वतः कोणतेच व कसल्याही प्रकारचे परिश्रम घेतले नाहींत तरी चालतें पण निसर्गोपचारांच्या बाबतींत तसें करून भागत नाहीं. निसर्गोपचारांवर राहूं इच्छिणाऱ्या रोग्याला अनेक प्रकारची पथ्यें संभाळावीं लागतात. त्याला आहार, विहार, व्यायाम इत्यादिकांच्या बाबतींत पुष्कळ मनः संयमन करावें लागतें, नेहेमींच्या राहणीवर नियंत्रण घालावे लागते व स्वतःचें स्वतःच रोगनिवारणाचे तंत्र संभाळावें लागते. त्याला दुसऱ्यावर अवलंबून चालत नाहीं. रोग्यानें जर अशा प्रकारें स्वतःला नियंत्रण घालून घेतलें व अगदी शास्त्रीय पद्धतीनें नैसर्गिक उपचार सुरू केले तर त्याला बरे होण्यास औषधापेक्षा कमी वेळ लागेल, हैं अनुभवसिद्ध आहे.
कोणत्याही प्रकारचे कृत्रिम किंवा वैद्यकीय उपचार न करतां केवळ नैसर्गिक साधनांनीं शारीरिक रोग हटविण्याचा प्रयत्न करणें म्हणजे निसर्गोपचार होय. शरीर हैं निसर्गसृष्टीचे बनलेले असल्यामुळे शरीराच्या सुस्थितीचे मार्ग निसर्गाला जितके ठाऊक आहेत तितके मनुष्याला असणे शक्य नाहीं. मात्र निसर्गोपचार म्हणजे रोग बरा करण्याचें कार्य पूर्णपणें निसर्गावर सोपविणे असें नव्हे. नैसर्गिक रीत्या किंवा आपोआप रोगी बरा होईल, ही उदासीन व निर्विकारी वृति निसर्गोपचाराच्या मुळाशीं नाहीं. एका वेळीं जास्तीत जास्त नैसर्गिक साधनें रोग्याच्या हवाली करणें, नैसर्गिक साधनांनीं रोगनिवारण कियेला सहाय्य करणे हा निसर्गोपचाराचा खरा अर्थ आहे. निसर्ग हा रोग्याचा धन्वंतरीनाहीं तर त्याचे औषध आहे. हवा, पाणी, उजेड, सूर्यप्रकाश, विश्रांति, लंघन, व्यायाम, युक्ताहार हीं रोगोपचाराचीं निसर्गाचीं साधने आहेत. तथापि निसर्ग स्वयंसिद्धपणें या साधनांचा उपयोग करूं शकत नाहीं. मनुष्यानेंच त्यांची यथायोग्य
योजना केली पाहिजे. म्हणजे योजक चागला असेल तर त्याला सर्व प्रकारच्या नैसर्गिक शक्तींचा योग्य उपयोग करून घेता येईल.
.
अमेरिकेतील एका जगप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ज्ञाने आपल्या निसर्गोपचारपद्धति' या आपल्या ग्रंथात निसर्गोपचाराची एक व्याख्या दिली आहे. निसर्गाशीं सुसंवादी किंवा निसर्गानुकूल अशी जी उपचार-
पद्धती ती निसर्गोपचारपद्धति असें त्या व्याख्येत म्हटलें आहे. या पद्धतीच्या पुरस्कत्यांचें असें म्हणणें आहे कीं, मनुष्य प्राणी जर आपली नेहेमींची रहाणी निसर्गानुकूल ठेवील तर त्याला रोगाचा प्रतिबंध करतां येईल, आणि तशांतही त्याला रोगाने पछाडलें तर निसर्गोपचारानें त्याला जसा कायमचा परिणामकारक आराम वाटेल तसा क्षणैक दुःखनिवारक औषधसेवनानें किंवा इतर औषधे घेऊन होत नाही.
यापुढील लेखात आपण निसर्गोपचारपद्धती कशी अवलंबिली पाहिजे ते आपण पाहुयात.
निष्कर्ष: निसर्गोपचार
टीप: नवीन ब्लॉगची notification मिळवण्याकरिता मेनू मध्ये जाऊन ब्लॉगला फॉलो/follow करा.
टिप्पण्या
thanks
उत्तर द्याहटवा